Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी अनुदानावरून शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे आक्रोश



[  शेतकऱ्यांच्या वतीने अनुदान मिळे पर्यंत प्रशासनाचे सर्व कार्यालयीन कामे ठप्प करू -- शिवसेना ‌नेते गजेंद्र देशमुख ]

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- तालुक्यात  मे 2025 पासून सलग झालेल्या अतिवृष्टी, वादळी पाऊस, अति पाऊस व पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे पंचनामे झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान न येता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

सदर सर्वे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांनी संयुक्तरित्या केलेला असून त्यांच्या मार्फतच याद्या पाठविल्या गेलेल्या आहेत, सिंदखेडराजा तालुक्यात केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी क्षतिग्रस्त व पुरसदृष्य भागाच्या केलेल्या दौऱ्या दरम्यान चावडी वाचन होवूनच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अनुदानाची यादी तयार करण्याचे निर्देश दिलेले होते. तरी अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाकडून हेक्टरी आठ हजार रुपये व तीन हेक्टरची मर्यादा आहे. के. वाय.सी. अभावी रक्कम रखडली गेल्याचे सांगीतले जात होते. त्यांनतर जवळपास शेतकऱ्यांनी के. वाय.सी.ची प्रक्रिया पुर्ण केलेली असून ही अद्याप पर्यंत अनेक शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहिलेले आहे. जेव्हां की, दिपावली पुर्वीच अनुदान मिळणे अपेक्षित होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गजेंद्र देशमुख यांनी शेतकरी बांधवांसह तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने मंजूर केलेले अनुदान अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अनेक शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर दिसत असूनही त्यांच्या खात्यावर मोबदला जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर दिवाळीनंतर आर्थिक संकट कोसळले आहे.

तहसील प्रशासनाकडून के. वाय सी. प्रक्रियेमधील अडचणी, अहवाल नोंदीतील विलंब आणि निधी हस्तांतरणातील तांत्रिक त्रुटी यामुळे अनुदान वितरण लांबणीवर पडल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे नुकसान दुपटीने वाढले असून शेतकरी वर्ग बिकट परिस्थितीत सापडला आहे.

गजेंद्र देशमुख यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान त्वरित जमा करण्याचे आवाहन केले. अन्यथा पुढील आंदोलनाची चेतावणी देखील त्यांनी दिली आहे.