पालघर प्रतिनिधी - धनेश क्षिरसागर
पास्थळ–बोईसर येथील गोल्डन टाऊन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये अन्नसुरक्षेबाबत अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्राहकांच्या आरोपानुसार, हॉटेलमध्ये Chicken Lollipop साठी राहिलेले (जुने) चिकन वापरले जात असून ते डबल फ्राय करून ग्राहकांना दिले जात आहे. या डबल फ्रायमुळे लॉलिपॉप काळे, अतिशय कडक आणि जळालेल्या स्वरूपाचे असल्याचे दिसून येत आहे.
ग्राहकांचे म्हणणे आहे की अनेक वेळा लॉलिपॉप आतून कच्चे किंवा अर्धवट शिजलेले असतात. तसेच काही वेळा चिकन फारच कमी आणि जाडसर कोटिंग जास्त देऊन ग्राहकांची फसवणूक केली जाते. असे अन्न खाल्ल्याने अन्नविषबाधा, पोटाचे गंभीर आजार, संसर्ग व इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा इशारा जाणकारांकडून दिला जात आहे.
या प्रकाराबाबत ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही हॉटेल मालकाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतरही अन्नाच्या दर्जात कोणतीही सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “हे हॉटेल नाही, तर मृत्यूचा सापळा आहे,” अशा शब्दांत काही संतप्त ग्राहकांनी प्रतिक्रिया दिली.
या गंभीर प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हॉटेलची सखोल तपासणी करावी, अन्ननमुने जप्त करून तपासणीस पाठवावीत आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाईसह हॉटेल सील करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
वेळीच ठोस कारवाई न झाल्यास भविष्यात एखादी मोठी आरोग्यदृष्ट्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे






Social Plugin