Ticker

6/recent/ticker-posts

अवघ्या २२ वर्षांमध्ये स्नेहल धुपे पैठण नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी विजयी



*अंबड तालुक्यातील वलखेडा येथील कन्येचा दणदणीत विजय*;

 शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उमेदवार पराभूत

अंबड प्रतिनिधी : -गणेश सपकाळ

अंबड तालुक्यातील वलखेडा येथील मूळ रहिवासी व सध्या पैठण येथे वास्तव्यास असलेले मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे यांची कन्या कुमारी स्नेहल सूर्यकांत धुपे हिने अवघ्या २२ व्या वर्षी पैठण नगरपरिषदेच्या नगरसेवक पदावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.या विजयामुळे पैठण शहरासह वलखेडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या कुमारी स्नेहल धुपे यांनी तरुणाई,महिलांचा विश्वास आणि विकासात्मक दृष्टिकोन यावर आधारित प्रचार केल्यामुळे दणदणीत विजय मिळवला.प्रचारादरम्यान त्यांनी स्वच्छता,पाणीपुरवठा,रस्ते, महिलांच्या समस्या,युवकांसाठी संधी तसेच नागरी मूलभूत सुविधांवर विशेष भर देत मतदारांशी थेट संवाद साधला.त्यांच्या साध्या,अभ्यासू व लोकाभिमुख स्वभावामुळे मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने कौल दिल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उमेदवारही मैदानात होते,परंतु मतदारांच्या पसंतीत स्नेहल धुपे पुढे राहिली.त्यांच्या विजयामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सध्या पैठण नगरपरिषदेत अपयशी ठरली.

मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी,सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि संस्कारांची शिदोरी याचा सकारात्मक परिणाम स्नेहल धुपे यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.वलखेडा गावाची कन्या पैठण नगरपरिषदेत नगरसेवकपदी पोहोचल्याने अंबड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.

अनेक सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहल धुपे यांचे अभिनंदन केले असून “तरुण,सुशिक्षित आणि संवेदनशील नेतृत्व नगरपरिषदेला लाभले आहे,” अशी भावना व्यक्त होत आहे.निवडीनंतर प्रतिक्रिया देताना कुमारी स्नेहल धुपे यांनी मतदारांचे आभार मानत सांगितले की,पैठण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून नागरिकांच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य देण्यात येईल.युवक,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त योजना प्रभावीपणे राबवण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.