सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- तालुक्यातील हनवतखेड ग्रामपंचायतीकडून १५वा वित्त आयोग निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी ८ डिसेंबर रोजी पंचायत समिती, सिंदखेडराजा येथील गट विकास अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अर्जदारांमध्ये अशोक वाघ, राजू जायभाये, दीपक जायभाये, संतोष वनवे, शिवानंद जायभाये, , शिप्रसाद जायभाये, लताबाई शिंगारे आणि गणेश वाघ यांचा समावेश असून त्यांनी मिळून हा अर्ज दाखल केला आहे.
काय आहेत आरोप?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, सचिव व मुख्याध्यापक यांनी ६ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रात १५वा वित्त आयोग निधीतून शाळेला व अंगणवाडीला मिळालेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या बिलांमध्ये नमूद केलेल्या वस्तू व प्रत्यक्षात मिळालेल्या साहित्यामध्ये मोठी तफावत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.
याशिवाय,
जुना सिमेंट रोड नव्याने केल्याचे दाखवत बिले काढणे,
पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती प्रत्यक्षात न करता खर्च दाखवणे,
तसेच मर्जीतील ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर करणे,
असे आरोप ग्रामसेवक कैलास झिने, सरपंच आशा जायभाये आणि ठेकेदार रवि जाधव यांच्यावर करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांनी अर्जासोबत १५वा वित्त आयोग निधीचा तारखेनुसार खर्च तपशील, शाळा समितीचे पत्र, अंगणवाडी शिक्षिकेने दिलेले पुरावे आणि ऑनलाइन कागदपत्रे यांची सत्य प्रती जोडल्या आहेत.
८ दिवसांत चौकशी अहवाल द्यावा – अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा
अर्जदारांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात आठ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तसे न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सर्व कागदपत्र प्रतिलिपी उच्च अधिकाऱ्यांकडे निवेदनात ही तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक आमदार मनोजभाऊ कायंदे यांनाही पाठविण्यात आली आहे.





Social Plugin