Ticker

6/recent/ticker-posts

डी. जी. मधील रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे उद्घाटन

छायाचित्र सातारा - मार्गदर्शन करताना  मिताली झा आणि दयाराम चौधरी सोबत प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ.गणेश जाधव, डॉ. राजशेखर, निल्लोलू, डॉ, विजय कुंभार व प्रो. डॉ. टी डी महानवर


(बँकिंग स्पर्धा परीक्षा केंद्राचे रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक)

 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी अंतर्गत बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक  मिताली झा तसेच चलन इशू विभागाचे व्यवस्थापक  दयाराम चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश जाधव, बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार, सी. डी. देशमुख अध्यासनाचे चेअर प्रोफेसर प्रा. डॉ. राजशेखर निल्लोलू, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. टी. डी. महानवर तसेच विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

डी. जी. महाविद्यालयात शहरातील नामांकित वाणिज्य महाविद्यालयांपेक्षाही उत्कृष्ट अशा सोयी-सुविधा उपलब्ध असून विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येथे राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयात बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्टॉक मार्केट लॅबोरेटरी, सी. डी. देशमुख मॉडेल बँक, उद्योजकता विकास केंद्र इत्यादी अत्यंत उपयुक्त सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाणिज्य शाखेत उत्तम करिअर घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्याचे गौरवोद्गार मा. मिताली झा यांनी काढले. शहरातील अनेक महाविद्यालयांमध्येही अशा सुविधा उपलब्ध नसताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले.

इतर अनेक वाणिज्य महाविद्यालयांमध्ये केवळ बी.कॉम. व एम.कॉम. हे अभ्यासक्रम चालविले जातात; मात्र या महाविद्यालयात बी.कॉम. अकाउंटन्सी, बी.कॉम. बँक मॅनेजमेंट, बी.कॉम. बिझनेस स्टडीज, बी.कॉम. बँकिंग अँड फायनान्स, बी.कॉम. बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स, बी.कॉम. फायनान्शियल मार्केट्स, बी.कॉम. एव्हिएशन मॅनेजमेंट, बी.सी.ए., बी.कॉम. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच एम.कॉम. बिझनेस स्टडीज, एम.कॉम. बँक मॅनेजमेंट, एम.कॉम. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एम.कॉम. अ‍ॅडव्हान्स्ड अकाउंटन्सी इत्यादी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात, ही बाब विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्तम रोजगारसंधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी बँकिंग क्षेत्राकडे वळले पाहिजे. विविध बँकिंग भरती परीक्षांची माहिती घेऊन त्यासाठी योग्य तयारी करावी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बँकिंग क्षेत्रात योगदान द्यावे, असे मत मा. दयाराम चौधरी यांनी व्यक्त केले.

बँकिंग क्षेत्रातील करिअरसाठी डी. जी. महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असून त्यांनी या केंद्राचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे मत मा. मिताली झा यांनी व्यक्त केले. परिसरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा व सुविधा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महाविद्यालय विशेष प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश जाधव यांनी केले.

देशातील प्रत्येक बँकिंग संस्थेत रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी कार्यरत असावा, या ध्येयाने प्रेरित होऊन बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविण्यात येत असून नाममात्र शुल्कात ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे केंद्र संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक असणारे दर्जेदार मार्गदर्शन विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजशेखर निल्लोलू, प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा. श्रीकांत गंगावणे, प्रा. अजित यादव, प्रा. रोहिणी भोसले, प्रा. असिफ मोदी, प्रा. रोहिणी धाईंजे, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. साझिया हुसेन, प्रा. साक्षी तारळकर, प्रा. निकिता जाधव आदींनी सहकार्य केले.