मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : यावर्षी मालेगाव तालुक्यात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र कांदा हे पीक अत्यंत नाजूक स्वरूपाचे असल्याने सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अनेक भागांत कांदा पिकावर सडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यासोबतच पात करपणे, मुळांजवळ कुज येणे अशा समस्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहेत.
या पार्श्वभूमीवर दुधाळा येथील युवा उद्योजक तथा काळे ऍग्रो ट्रेडर्सचे शिरपुर संचालक गोपाल विलास काळे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतबांधावर भेट देत कांदा पिकाचे शास्त्रोक्त नियोजन कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पिकातील रोगांची लक्षणे ओळखणे, सडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोणते उपाय योजावेत, तसेच खत व औषधांचा संतुलित वापर कसा करावा, याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
कांदा पिकातील पाण्याचे नियोजन, जमिनीतील ओलावा राखणे, हवेशीर परिस्थिती निर्माण करणे व योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गोपाल काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी घाईगडबडीने उपाय न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
काळे ऍग्रो ट्रेडर्सच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला असून, अडचणीच्या काळात थेट शेतात येऊन मिळालेले मार्गदर्शन उपयोगी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कांदा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी असे प्रत्यक्ष मार्गदर्शन उपयुक्त ठरत असून, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.





Social Plugin