Ticker

6/recent/ticker-posts

कन्हान–तारसा रोड चौकात भीषण अपघात : कोळसा वाहतूक करणाऱ्या टेलर ट्रकने वृद्ध पादचाऱ्याला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू









रॉबिन निकोसे महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी(नागपूर)

ट्रकचालक वाहनासह पसार; जड वाहतुकीवर बंदी असतानाही कोळसा ट्रकांचे मनमानीने नागरिकांचा संताप उसळला

कन्हान :— शहरातील तारसा रोड चौकात शनिवार (दि. ६ डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता कोळसा वाहतुकीच्या वेगाने धावणाऱ्या टेलर ट्रकने वृद्ध पादचाऱ्यास जोरदार धडक देत चिरडून टाकले. या भीषण अपघातात नानाजी उरकुडा लाडे (वय ६५, रा. ब्राह्मणी, जि. गडचिरोली) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी ट्रक चालक अंधाराचा फायदा घेत वाहनासह पसार झाला.

✔ मृतकाचा प्रवास – आणि परतताना मृत्यू

नानाजी लाडे हे मागील दोन वर्षांपासून कन्हान येथील हनुमान नगरात आपल्या नातीन मीनाक्षी सहारे हिच्या घरी राहत होते. काही दिवसांपूर्वी (दि. २९ नोव्हेंबर) ते ब्राह्मणी येथे गेले होते. ते शनिवारी दुपारी तांदुळाची पिशवी घेऊन परत कन्हानमध्ये उतरले आणि पायी हनुमान नगराकडे जात असताना ही दुर्घटना घडली. तारसा रोडकडून कांद्रीच्या दिशेने बिनधास्त वेगाने धावणाऱ्या मुव्हर्स ट्रान्सपोर्टच्या टेलर ट्रकने त्यांना उडवून दिले. ट्रकची चाके त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.

✔ घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी – पोलिस प्रशासनावर संतप्त घोषणा

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जड वाहतुकीवर बंदी असतानाही शहरातून कोळसा, रेती, राखेचे ट्रक सतत धावत असल्याने नागरिकांचा राग अनावर झाला.

नागरिकांनी संतप्त स्वरात प्रश्न उपस्थित केले :

“किती जीव गेले की पोलिस जागे होणार?”

“जड वाहतूक शहरातून थांबवणार कोण?”

ट्रान्सपोर्टर्स आणि काही राजकीय व्यक्तींमधील साटेलोटे असल्याचा संशयही नागरिकांनी व्यक्त केला.

✔ अकरा दिवसांत दुसरा मृत्यू; सततच्या अपघातांनी परिसर हादरला

यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी धन्यवाद गेट, कांद्री येथे अशाच प्रकारच्या कोळसा ट्रकने पवन अरुण मेश्राम (वय ३५) यांना चिरडून ठार केले होते. त्या घटनेचा धक्का ताजा असतानाच पुन्हा एक बळी गेल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

✔ पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवाधरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

मृताच्या नात मीनाक्षी अमोल सहारे (वय ३०) यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

✔ जड वाहतुकीच्या मनमानीवर नागरिकांचा रोष

तारसा रोड मार्गाने जड वाहतुकीस स्पष्ट बंदी असतानाही टोल टाळण्यासाठी ट्रक शहरातूनच जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

दहाचाकी, बारा चाकी, ट्रेलर ट्रकांची अनधिकृत वर्दळ

पोलिसांची निष्क्रियता

ट्रान्सपोर्टर्सना मिळणारा कथित राजकीय आधार

यामुळे अपघातांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोचले आहे.

“लोक मरतात… पण लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेतात”

असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला