Ticker

6/recent/ticker-posts

जालना महानगरपालिका निवडणूक : भाजपा–शिंदे शिवसेना युती तुटली; गोरंट्याल–खोतकर पुन्हा आमनेसामने





जालना | प्रतिनिधी : संजीव पाटील

जालना महानगरपालिका स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती अखेर तुटल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. परिणामी, कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि आमदार अर्जुनराव खोतकर हे पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले गट) यांच्यात महायुतीसाठी तब्बल सहा बैठका झाल्या. मात्र, जागावाटपावर एकमत न झाल्याने या सर्व बैठका निष्फळ ठरल्या. अखेर भाजपा व शिंदे शिवसेना गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे युती अधिकृतपणे फिस्कटली आहे.

याच पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव करणारे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याशी आता महानगरपालिका निवडणुकीत थेट सामना होणार आहे. विशेष म्हणजे, कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पत्नी व मुलाला महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेही स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी, “भाजपा व शिंदे शिवसेना गटाने आम्हाला विचारात न घेतल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,” असे स्पष्ट केले.

आज महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक उमेदवारांनी पक्षाचा ‘बी-फॉर्म’ घेऊन अर्ज दाखल केले, तर काही बंडखोर व अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच खरे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

जालना महानगरपालिकेच्या एकूण ६५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, भाजपा व शिंदे शिवसेना गटात जागावाटपावर तोडगा न निघाल्याने युती तुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचदरम्यान, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह २३ माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, याच नगरसेवकांच्या उमेदवारीवरून शिंदे शिवसेना गट आणि भाजपा यांच्यात मतभेद वाढल्याचे बोलले जात आहे.

भाजपाचे शहराध्यक्ष भास्करराव आंबादानवे, आमदार अर्जुनराव खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात जागावाटपावर अंतिम तोडगा न निघाल्याने ही युती अखेर तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूणच, जालना महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुकोनी लढत ठरणार असून, सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर किंवा स्वतंत्र आघाड्यांमधून मैदानात उतरल्याने मतदारांसमोर अनेक पर्याय असणार आहेत.