Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवरायांचे स्फूर्तीदायक जीवन चरित्र या विषयावर शिवव्याख्यान संपन्न

 


अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

आज दिनांक 3 जानेवारी 2026 वार- शनिवार रोजी पं.गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात कै. दत्ताजी भाले स्मृतिदिनानिमित्त शिवव्याख्याते/ दुर्गभ्रमंतीकार डॉ.शिवरत्न शेटे (सोलापूर ) यांचे छत्रपती शिवरायांचे स्फूर्तीदायक जीवन चरित्र या विषयावर शिवव्याख्यान संपन्न झाले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.वेंकटेश गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबेजोगाई च्या उपाध्यक्ष सौ.ज्योती भाभी ठाकूर,डॉ.श्री विष्णू सोनवणे (केंद्रीय कार्यकारी सदस्य,भाशिप्र संस्था आंबेजोगाई) उपस्थित होते.

शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांचा पराक्रम,संघटन कौशल्य,दूरदृष्टी यांच्यावर दृष्टीक्षेप टाकला. शिवाजी महाराज हे धार्मिक,पर्यावरणवादी,आई-वडिलांच्या आज्ञा पाळणारे होते,आपल्या सहकारी मावळ्यांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे होते असे त्यांनी सांगितले. 

आजकाल विविध महापुरुषाच्या जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीतील व्यसनाधीनता वाढता डिजेचा वापर याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती सांगून,महापुरुषाच्या जयंतीनिमित्त व्यसन करून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्व राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून राज्यकारभार केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सर्व राज्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.सौ ज्योती भाभी ठाकूर यांनी आपल्या मनोगतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची ओळख सर्वांना करून दिली. स्त्रियांच्या आजच्या प्रगतीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.विष्णू सोनवणे यांनी हे वर्ष वंदे मातरम या गीताचे शतकत्तोर सुवर्ण जयंती वर्ष असल्याने या गीताचे स्मरण करून अनेक देशभक्त क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचे स्मरण सर्वांनी ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात श्री वेंकटेश गोसावी यांनी कै.दत्ताजी भाले स्मृती व्याख्यानमालेचा पूर्व इतिहास व व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला.

या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकाचा मान्यवरांच्या हस्ते शाल,स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी सर यांनी तर वैयक्तिक पद्य सौ.रेखा देशमुख यांनी सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती मेघा वायकोस यांनी तर आभार प्रदर्शन श्री.श्रीपादजी जपे यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी,संघ पदाधिकारी,अंबड शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,महाविद्यालयीन तरुण, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.