सहा जणांची प्रकृती चिंताजनक; हॉटेलमध्ये आढळला २२ सिलेंडरचा बेकायदेशीर साठा
पाटस | प्रतिनिधी : गणेश गावडे
दौंड तालुक्यातील गिरीम गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल जगदंबा येथे बुधवारी दुपारी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत हॉटेलमधील १२ कर्मचारी गंभीररीत्या भाजले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की हॉटेलच्या छताच्या पत्र्यांसह साहित्य विखुरले गेले.
दोन सिलेंडरचा भीषण स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, पाटास-दौंड अष्टविनायक रस्त्यावर असलेल्या हॉटेल जगदंबा येथे बुधवारी (दि. ७) दुपारी १ च्या सुमारास स्वयंपाकाचे काम सुरू असताना अचानक दोन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर क्षणात आगीचा मोठा लोळ उसळला. यावेळी हॉटेलमध्ये १० ते १२ कर्मचारी कार्यरत होते. या स्फोटात स्वयंपाक करणाऱ्या एका महिलेसह एकूण १२ कर्मचारी होरपळले आहेत.
सहा कर्मचारी ८० टक्के भाजले
जखमींपैकी सहा कर्मचाऱ्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते ८० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यांना तातडीने पुण्यातील शासकीय ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर दौंडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, स्फोटाच्या वेळी हॉटेलमध्ये ग्राहक उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
२२ सिलेंडरचा साठा; १२ घरगुती गॅस जप्त
घटनेनंतर पोलिसांनी हॉटेलची पाहणी केली असता तिथे तब्बल २२ भरलेले गॅस सिलेंडर आढळून आले. यात १० व्यावसायिक तर १२ घरगुती वापराचे सिलेंडर होते. घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीररीत्या व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी हॉटेल मालक आणि संबंधित गॅस वितरण एजन्सीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
प्रशासनाकडून तातडीने मदत
घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंड नगर परिषद आणि कुरकुंभ औद्योगिक विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच रुग्णवाहिका २० मिनिटांत दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि पुढील धोका टाळला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बॉक्स : जखमींची स्थिती
प्रकृती चिंताजनक
एकूण जखमी: १२ कर्मचारी.
गंभीर: ६ जण (८०% पेक्षा जास्त भाजले).
रुग्णालय: ससून रुग्णालय, पुणे.
इतर: ६ जणांवर दौंडमध्ये उपचार सुरू.





Social Plugin