Ticker

6/recent/ticker-posts

आज रंगणार 'शूटिंग व्हॉलीबॉल'चा महासंग्राम; १५ हजारांच्या बक्षिसासाठी संघ मैदानात.



गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी

पाटस:पाटस(ता. दौंड)येथील श्री नागेश्वर मित्र मंडळ व प्रियदर्शनी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू कै. संपत (नाना) भागवत यांच्या स्मरणार्थ आज, रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भव्य 'निमंत्रित शूटिंग व्हॉलीबॉल' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अमॅच्युअर शूटिंगबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील बलाढ्य संघ आपले नशीब आजमावणार असून, क्रीडाप्रेमींना खेळाचा मोठा थरार अनुभवायला मिळणार आहे.

​या स्पर्धेसाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि नवी मुंबई अशा विविध जिल्ह्यांतील नामांकित संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. सर्व सामने पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या कुस्ती मैदानाशेजारी सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरू होतील.

​स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी समस्त ग्रामस्थ कसबे पाटस यांच्या वतीने भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकास १५,००० रुपये, द्वितीय ११,००० रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी ७,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट शूटर, डिफेंसर आणि पंचर यांनाही वैयक्तिक रोख पुरस्कारांनी गौरविण्यात येईल.

​स्पर्धेचे नियोजन संतोषभाऊ शितकल, संजय म्हस्के, महेश साळुंखे आणि को-अर कमिटीच्या सदस्यांनी केले आहे. नॅशनल प्लेयर कै. संपत (नाना) भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या या क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.