बुध दि . [प्रकाश राजेघाटगे )
भोसे, ता. कोरेगाव परिसरात एका ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत कामगाराचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४२, रा. उखळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे असून, ते गेल्या काही वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव, ता. कोरेगाव परिसरात वास्तव्यास होते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव) याने १५ जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी नेत असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले. त्यानंतर तेथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे तपासात समोर येत आहे. घटनेनंतर मृतदेह शेतात आढळून आला.
या घटनेनंतर आरोपी अजय माने याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून, त्याला उपचारासाठी कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्या वेळी कुटुंबीयांना या घटनेची माहिती नव्हती.
दरम्यान, मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने १७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेल्यानंतर तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होत आरोपी अजय माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत.
या घटनेची माहिती परिसरात तसेच बीड जिल्ह्यात पसरली असून, मृताच्या नातेवाईकांनी कोरेगावकडे धाव घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी गोरख अंबादास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय राजेंद्र माने याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या उपचार घेत असल्याने घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.





Social Plugin