अनिकेत चांदणे प्रतिनिधी
गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले हे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी ६ मे २०१९ रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास प्रथम तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला. त्यानंतर बालापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी पुढील तपास करत एक हजारांहून अधिक कागदपत्रांची आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत कोणतेही ठोस व विश्वासार्ह पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.
आज झालेल्या अंतिम सुनावणीत या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात श्रीराम गावंडे, रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.





Social Plugin