प्रतिनिधींच्या बातमीची आणि ग्रामस्थांच्या संतापाची प्रशासनाकडून दखल; २ वर्षांची प्रतीक्षा संपली
पाटस प्रतिनिधी- गणेश गावडे
बिरोबावाडी (ता. दौंड): येथे ग्रामसभा असूनही केवळ रॅम्प नसल्यामुळे एका दिव्यांग बांधवाला दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या उंबरठ्याबाहेरूनच सभा पहावी लागत होती. या संतापजनक प्रकाराबाबतचे वृत्त २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होताच प्रशासनाचे धाबे दणाणले आणि अवघ्या काही दिवसांतच या ठिकाणी रॅम्पचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे आता दिव्यांग बांधवांना सन्मानाने ग्रामसभेत प्रवेश मिळणार असून, परिसरातून या कारवाईचे स्वागत होत आहे.
गेल्या अनेक ग्रामसभांमध्ये मागणी करूनही ग्रामसेवक या विषयाकडे दुर्लक्ष करत होते. "ग्रामविकासाच्या आराखड्यात दिव्यांगांना स्थान का नाही?" असा सवाल करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्यात आले.
माध्यमांच्या बातमीचा 'इम्पॅक्ट'!
२६ डिसेंबर रोजी "लोकशाहीची थट्टा! रॅम्पअभावी दिव्यांग बांधवावर ग्रामसभा बाहेरून पाहण्याची वेळ" या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या भावना आणि दिव्यांग बांधवाची होणारी कुचंबणा चव्हाट्यावर आल्यामुळे प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली.
"उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली. रॅम्प झाल्यामुळे आता आमचा दिव्यांग बांधव सभेच्या चर्चेत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकेल. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे."— संतप्त ग्रामस्थ, बिरोबावाडी.





Social Plugin