Ticker

6/recent/ticker-posts

स्व. विलासराव देशमुखांवर अवमानकारक वक्तव्याचा भडका; मौजे राहेरी बु. येथे रवींद्र चव्हाणांविरोधात संतप्त तिव्र निषेध!



सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा – तालुक्यातील मौजे राहेरी बु. येथे आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ नागरिकांनी बॅनर जाळुन,बॅनर ला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त केला. गावातील सर्व सन्माननीय जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी एकत्र येऊन या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी कोणतीही वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. सदर वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांनी संयम व सुसंस्कृत भाषा वापरावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

याप्रकरणी रवींद्र चव्हाण यांनी जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, अशी मागणीही उपस्थित नागरिकांनी केली. निषेध आंदोलन शांततेत पार पडले असून, लोकशाही मूल्ये व महापुरुषांचा सन्मान अबाधित ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.