बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज ते पुसेगाव मार्गावरील खातगुण फाटा येथे मंगळवारी सकाळी ट्रॅक्टर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
प्रथमेश बाळू यलमारे (वय २३, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास प्रथमेश यलमारे हा आपल्या स्प्लेंडर मोटारसायकलने (क्र. MH 13 DR 9397) वडूजकडून पुसेगावच्या दिशेने जात होता. यावेळी खातगुण फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅक्टरने (क्र. MH-23 BN-1026) प्रथमेशच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
हा ट्रॅक्टर रविंद्र सुरेश गाडेकर (वय २१, रा. लिंबागणेश, जि. बीड) हा चालवत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक ट्रॅक्टर वळवल्यामुळे ही धडक बसली. या भीषण अपघातात प्रथमेशला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलीस कारवाई
याप्रकरणी मृताचा मेहुणा अतुल रामचंद्र यलमारे (वय ३५, रा. वडूज) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक रविंद्र गाडेकर याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तात्यासाहेब ढोले करत आहेत.





Social Plugin