देगलूर प्रतिनिधी :
घरात कोणताही शैक्षणिक किंवा बँकिंग क्षेत्राचा वारसा नसताना, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर खानापूर येथील सुमय्या शेख हिने बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीयकृत असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या उपशाखाधिकारी पदावर तिची निवड झाली असून ग्रामीण भागातील, विशेषतः खानापूर गावातील बँकिंग क्षेत्रात अधिकारी पद गाठणारी ती पहिली महिला ठरली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत सुमय्या शेख हिने बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. कोणतीही खासगी शिकवणी न लावता, स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करत तिने अखेर यशाला गवसणी घातली. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन बोर्डातर्फे १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल गुरुवारी, १५ तारखेला जाहीर झाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून सुमय्या गौस शेख हिची महाराष्ट्र बँकेत उपशाखाधिकारी पदावर निवड जाहीर झाली.
सुमय्या शेख हिने प्राथमिक शिक्षण खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले, तर माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूलमधून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी तिने लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. पदवी शिक्षणानंतर बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा ठाम निर्णय घेऊन तिने स्वतःच्या मेहनतीवर अभ्यास सुरू ठेवला आणि त्याचे फलित आज अधिकारी पदाच्या रूपाने तिच्या हाती आले आहे.
या यशामागे कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. तिची मोठी बहीण आयेशा बेगम गौस शेख हिची लोकसेवा आयोगामार्फत गतवर्षीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाली असून तिच्या मार्गदर्शनाचा सुमय्याला लाभ झाला. तर लहान भाऊ मुजफ्फर शेख हा होमिओपॅथी शाखेचे शिक्षण घेत आहे. सुमय्याच्या यशामुळे खानापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी तिचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील मुलींना बँकिंगसारख्या किचकट पण सुरक्षित आणि प्रतिष्ठित क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी असल्याचे मत व्यक्त करत सुमय्या शेख म्हणाली की, व्यवहारिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत या क्षेत्रात काम करता येते. तिच्या या यशाचे देगलूर येथील उद्योजक शेख आयुबसेठ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले असून सुमय्याची ही कामगिरी अनेक ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





Social Plugin