देगलुर.. प्रतिनिधी
समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने सातत्यपूर्ण सेवा करणारे सत्यभामा भीमराव दिपके (रा. सुंडगी) यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी कार्याची दखल घेऊन ‘आदर्श परिचारिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान जेतवन सामाजिक शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्ट, सुजयतपूर यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषद अंतर्गत प्रदान करण्यात आला. समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांच्या सेवेसाठी त्यांनी दाखविलेली सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.
सत्यभामा दिपके यांनी आपल्या कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना न्याय, सन्मान व आत्मविश्वास देण्याचे कार्य केले आहे. वैयक्तिक लाभापेक्षा समाजहिताला अग्रक्रम देत त्यांनी आरोग्य सेवा, सामाजिक मदत, शैक्षणिक जागृती व नैतिक मूल्यांची जोपासना या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला असून समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्य, चिकाटी व माणुसकीची जाणीव. कोणताही भेदभाव न करता त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्यामुळे समाजात सेवाभावी वृत्तीचा आदर्श निर्माण झाला असून नव्या पिढीला समाजसेवेची प्रेरणा मिळत आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जेतवन सामाजिक शैक्षणिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सावित्री ताई शेवाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्षा, प्राध्यापिका छायाताई बोरकर, व पूजनीय भंतेजी यांच्या उपस्थितीत,हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून भविष्यात अधिक जोमाने समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी, मान्यवर पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरांतून सत्यभामा भीमराव दिपके यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व सेवाभावी कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.





Social Plugin