गरजू रुग्णांना मिळाला मोठा दिलासा.
दिनेश पत्की कळमनुरी हिंगोली
येथील उपजिल्हा रुग्णालयात मूत्रपिंड विकारांवरील उपचारासाठी आवश्यक असलेली डायलेसिस सुविधा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे यांनी केले आहे.
डायलेसिस उपचारासाठी रुग्णांना यापूर्वी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र खासगी रुग्णालयांतील महागड्या उपचारांमुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना कमी खर्चात उपचार मिळत असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटरमध्ये एकूण ८ डायलेसिस मशीन उपलब्ध आहेत. या केंद्रामध्ये सध्या १५ रुग्ण नियमित उपचार घेत असून दररोज सुमारे ५ रुग्णांवर डायलेसिस प्रक्रिया केली जात आहे. डायलेसिस सेंटरमध्ये प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेषराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. परमेश्वर शिंदे, टेक्निशियन शेख ईफत व शेख असलम हे रुग्णांवर उपचार करीत आहेत. या सुविधेमुळे तालुक्यातील व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होत आहे. डायलेसिसची गरज असलेल्या रुग्णांनी या सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin