Ticker

6/recent/ticker-posts

राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तीचा गौरव; अभिमानाची बाब.



देगलूर- प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्श, विचार व कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी “छत्रपती शिवाजी गौरव सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या गौरव सोहळ्याचे आयोजन लायन्स क्लब जयपूर हवामहल (प्रांत 3233E1) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील शेळगाव छत्री, ता. नायगाव येथील रहिवासी श्री. अविनाश विठ्ठलराव अनेराये यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एका व्यक्तीला राजस्थानसारख्या राज्यात सन्मानित करण्यात येणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

सदर गौरव सोहळ्याचे मुख्य अतिथी माननीय श्री. हरिभाऊ किसनराव बागडे, राज्यपाल, राजस्थान हे असणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ राजस्थान, जयपूर येथे संपन्न होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिष्ठा, शौर्य, सामाजिक न्याय व लोककल्याणाच्या विचारांना समर्पित असलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, हा सन्मान सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

विशेष म्हणजे, सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असलेले श्री. अविनाश अनेराये गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग क्षेत्रात सातत्याने कार्य करत असून, त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.