(प्रतिनिधी ओंकार पुरी)
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विकासाचा ध्यास घेणारे कणखर नेतृत्व आणि जनसामान्यांचे 'दादा' स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरात अस्थिकलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे उद्या, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता रिसोड नगरीत आगमन होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार दर्शन सोहळा
अजितदादांच्या अस्थींचे दर्शन आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिसोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी तालुक्यातील हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा मानाचा मुजरा देतील. दादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सिंचन, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत जे योगदान दिले, त्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला जाणार आहे.
सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अंकुश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पक्षीय राजकारण पलीकडे जाऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य जनता या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असून, त्यांच्या कार्यप्रणालीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात येईल.
दिनांक मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६, दुपारी १:०० वाजता (अस्थिकलश आगमन), ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिसोड,आयोजक अंकुश देशमुख व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिसोड तालुका, तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाडक्या दादांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





Social Plugin