प्रतिनिधी- गौरव ब्राम्हणवाडे
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज भातकुली तालुक्याचा दौरा करून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच मत्स्य व्यवसाय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्प उभारणीपासून ते शेतकरी व उद्योजकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यांचा आढावा घेतला.
रामानगर (ता. भातकुली) येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अमोल पाठक यांनी उभारलेल्या दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. प्रकल्पाची निर्मिती, उत्पादन क्षमता, भविष्यातील विस्तार व रोजगारनिर्मितीबाबत माहिती घेतली. खवा, पनीर यासोबतच इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढवावे, उद्योगाचा विस्तार करावा तसेच संस्थात्मक स्वरूप देऊन उत्पादनाच्या ब्रँडींगवर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांना महाविस्तार – एआय मोबाईल अॅप्लिकेशनचा सक्रीय वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर टाकरखेडा, शंभु येथे आत्मा अंतर्गत ४४ एकर क्षेत्रावर राबविण्यात येत असलेल्या चिया सिड प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. यामधील योगेश देशमुख यांच्या दोन एकरवरील चिया सिड लागवडीची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादनातून मिळणाऱ्या फायद्यांची माहिती घेतली. चिया सिड लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत प्रत्यक्ष उत्पादनानंतर झालेल्या लाभाची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कृषी मॅपर अॅपमध्ये पीक प्रात्यक्षिकाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच नांदगाव पेठ एमआयडीसी अंतर्गत सावर्डी येथील ऑस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे, तहसीलदार विजय लोखंडे, अक्षय मंडवे, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, प्रशांत गुल्हाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.





Social Plugin