Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे मुक्तांगण शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले यांचा गौरव .

  


देगलूर तालुका प्रतिनिधी- जावेद अहेमद

पु.ल. देशपांडे यांनी सांस्कृतिक जाणिवेतून साकार केलेल्या विटा जि. सांगली येथील ‘मुक्तांगण वाचनालय’ यांच्यावतीने अखंडपणे ४४ वर्ष ग्रामीण साहित्य संमेलन घेण्यात येते. नुकत्याच पार पडलेल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ आसाराम लोमटे हे होते. तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यावर्षी देगलूर महाविद्यालय देगलूर येथील मराठी विभागप्रमुख डॉ विठ्ठल जंबाले यांच्या शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना 'साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे मुक्तांगण शिक्षकरत्न' राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी ग्राम विकास मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार डॉ जंबाले यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जंबाले यांना सन्मानपत्र आणि संत तुकाराम यांचे शिल्प देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.

डॉ. विठ्ठल जंबाले यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे हे मराठी अभ्यास मंडळावर कार्य केले. तसेच अभ्यासक्रमातील पुस्तकांचे संपादने केली. डॉ जंबाले हे मराठवाडी बोलीभाषेचे अभ्यासक म्हणून साहित्य वर्तुळात परिचित आहेत. ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य आणि मराठवाडी बोली या विषयावर त्यांचे संदर्भग्रंथसुद्धा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची जडणघडण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन क्षेत्रातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी सहा विद्यार्थ्यांनी संपादन केली. संशोधनवृत्ती जोपासण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून तीन लघुशोध प्रकल्पासाठी त्यांना अनुदान मिळाले.

याप्रसंगी मुक्तांगण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ रघुराज मेटकरी, त्यांचे विश्वस्त मंडळ तथा मराठी सारस्वतातील रसिक श्रोते विपुल संख्येने उपस्थित होते. साहित्य संमेलनातील वेगळिक म्हणजे आरंभी कविसंमेलनात अबालवृद्ध सहभागी होते. दुपारी उद्घाटन सोहळा आणि सायंकाळी कथाकथन उशिरापर्यंत चालू होते. अशा सांस्कृतिक क्षेत्रात पुलनी रोपटे लावलेल्या मुक्तांगण प्रतिष्ठानकडून डॉ विठ्ठल जंबाले यांनी शिक्षकरत्न पुरस्कार सानंद स्वीकारल्याबद्दल त्यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार मंडळींच्या वतीने सहर्ष स्वागत होत आहे.