ग्रामस्थांचा पेन्ना सिमेंटला कायदेशीर इंगा; ७ दिवसांत वाहतूक बंद करण्याचा इशारा
पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
दौंड/पुणे:येडेवस्ती (नवीनगार) येथील ग्रामस्थांनी पेन्ना सिमेंट (अदानी सिमेंट ग्रुप) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, बेकायदेशीर जड वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासापोटी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पेन्ना सिमेंट कंपनी कानगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असूनही, कोणतीही रीतसर परवानगी किंवा नाहरकत दाखला (NOC) न घेता येडेवस्तीच्या अंतर्गत रस्त्याचा वापर व्यावसायिक जड वाहतुकीसाठी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सततच्या वाहतुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ प्रदूषण होत असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे, ज्याचा थेट परिणाम लहान मुले, वयोवृद्ध यांचे आरोग्य आणि शेतातील पिकांवर होत आहे. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कंपनीने नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवल्याने, श्री. आकाश दिलीप येडे व समस्त ग्रामस्थांनी अॅड. प्रविण धनाजी शितोळे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. यामध्ये ७ दिवसांच्या आत अंतर्गत रस्त्यावरील जड वाहतूक तात्काळ बंद करून कंपनीने स्वतःच्या हद्दीतून रस्ता विकसित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर विहित मुदतीत अटींची पूर्तता झाली नाही, तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT), पुणे येथे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि या सर्व कायदेशीर परिणामांना व खर्चाला पेन्ना सिमेंट कंपनी सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
कायद्याचे उल्लंघन की अधिकार्यांचा वरदहस्त?





Social Plugin