प्रतिनिधी @ रमेश्वर तोंडे लोणी गवळी
चिखली:-जि .प.
हायस्कूल मंगरूळ नवघरे येथील प्राचार्य वसंतराव गाडेकर व विद्यार्थिनींकडून कृतिशील संवेदनेचे दर्शन*
मंगरूळ नवघरे : चिखली तालुक्यात शालेय शिक्षणासोबतच सामाजिक दातृत्वाचे कृतिशील संस्कार देणाऱ्या मंगरूळ नवघरे येथिल जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थिनींनी शाळेचे उपक्रमशिल प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांची प्रेरणा घेत त्यांचे मार्गदर्शनाखाली नित्यानंद आश्रमातील निराधार व अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तुंची भेट देऊन गुढी पाडवा आणि ईद सण साजरा करीत समाजासमोर एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे .
याबाबत सविस्तर असे की , आजची पिढी खूप असंवेदनशील असून खूप शौकीन आणि आभासी दुनियेत रमून चंगळवादी जगण्याचा आनंद घेणारी आहे आणि
फक्त आपल्यापुरताच विचार करत जगणारी पिढी आहे अशा तक्रारी आपण सदैव करतो.
परन्तु शालेय गुणवत्तेसोबत विद्यार्थ्याच्या चोचीत कृतिशील संस्काराचे घास भरवणाऱ्या जि . प . हायस्कूल मंगरूळ येथिल इयत्ता 8 वीच्या मुलींनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या स्वयंप्रेरणेने गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर जो काही सामाजिक उपक्रम राबवला तो निश्चितच माणुसकीला उंचीवर नेणारा तर आहेच परंतु आजची पिढी अजूनही समाजातील वंचित घटकांप्रती किती संवेदनशील आहे.. ह्याची प्रचिती देणारा ठरला असून ह्या उपक्रमात शाळेतील विनयशिल विद्यार्थिनी कु . अनहा शेख अनिस , कु . नम्रता संजय येळवंडे , कु . समृद्धी सतिश आंभोरे, कु . स्नेहल पवन मगर , कु . लावण्या कैलास तांबट या मुलींनी आपल्या आईवडिलांनी प्रेमापोटी खाऊसाठी दिलेले पैसे, विविध प्रकारच्या स्पर्धांतून मिळालेल्या बक्षिसांचे पैसे तसेच शाळेचे प्राचार्य व गुरुजनांकडून काही रक्कम संकलित करून हिवरा आश्रम येथिल नित्यानंद आश्रमातील निराधार व अनाथ मुलांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उदात्त हेतूने गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर ह्या मुलींनी त्यांचे प्रेरणास्थानी असलेले प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी तसेच शाळेचे शिक्षक पंढरी भिमराव रिंढे व मंगरूळ येथिल माजी सरपंच मनोहरभाऊ शिंदे यांच्या समवेत आश्रमाला भेट देऊन त्यांना 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध करून देत शाळेचे प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांची प्रेरणा घेऊन समाजासमोर एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला असून या विद्यार्थिनींनी अनाथ मुलांच्या प्रती आपली कृतिशील संवेदना अधोरेखित करत मानवतेचे प्रांगण प्रशस्त केले.
एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक सामाजिक संस्था प्रचंड अडचणीत आलेल्या असताना... ह्या शाळेतील मुलींनी सुपूर्द केलेला हा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भक्कम दिलासा देणारा असल्याची कृतार्थ प्रतिक्रिया प्रकल्प सेवक अनंत शेळके यांनी सद्गदित होऊन दिली.
गुणवत्तेची अलौकिक परंपरा लाभलेली जीप हायस्कूल मंगरूळ नवघरेची शाळा आपल्या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमातून शिक्षणातून माणूस घडविण्यासाठी अव्याहत धडपडत असते
शालेय व सहशालेय उपक्रमातून ......
"चोहीकडून घेताना...
जीवनात थोड देणही शिकावं..
स्वतः जगून दुसऱ्यांना..
जगवन शिकवावं"
ह्या ओळींना कृतीरूप देण्याची धडपड ह्या ज्ञान शारदेच्या प्रांगणातून सदैव घडत असते. जीवन सुंदर करण्याच्या मूल्यांची पायाभरणी जिथे शालेय जीवनात रुजते तिथेच अशा उस्फुर्त कृतिशील संस्काराच्या डहाळ्या विस्तारत जातात आणि संवेदनशीलतेचा परिपाक उत्कृषित विकसित होत जातो. आणि समाजाच्या सुख दुःखाशी समरस होण्याची वृत्ती विकसित होते.
"कानी येता व्याकुळ हाका
धावत जावे पायांनी
रक्ताच्या थेंबा थेंबा मधुनी .
माणुसकीचा गहिवर दे
अंगावरती कापड दे
डोक्यावरती छप्पर दे
जगण्यासाठी प्रत्येकाला
पोटापुरती भाकर दे "
मानवतेला उंचीवर नेऊन माणुसकी धर्म वाढविणाऱ्या ह्या ओळींचे कृतिशील गुंजन इथल्या शाळेतील रोमा रोमात.... रुजवण्यासाठी समस्त शिक्षक व गुरुजनाच्या सहेतुक सामूहिक प्रयत्नातून इथे घडत असते.
म्हणूनच आपल्या खाऊच्या पैशातून केवळ आपल्या पुरता विचार न करता.. रंजल्या गांजल्या अनाथ मुलांना फुल ना फुलाची पाकळी का होईना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविनाऱ्या विद्यार्थिनी ह्याच शारदेच्या प्रांगणातून पुढे येत सामाजिक बांधिलकीचं पाऊल उचलत समाजासमोर अनुकरणीय आदर्श निर्माण करतात.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नित्यानंद सेवा प्रकल्पातील बालकांनी सर्वश्री उपस्थित वसंत गाडेकर सर, रिंढे सर व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिंदे मामा ह्यांचे स्वागत गीतांनी स्वागत केले.
प्रकल्प सेवक अनंत शेळके यांनी ह्या सेवा उपक्रमात आपले आर्थिक योगदान देणाऱ्या विद्यालयातील सर्व मुलींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.





Social Plugin