Ticker

6/recent/ticker-posts

पाटसमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची विटंबना; समाजकंटकांकडून तोडफोड, उद्या भव्य निषेध मोर्चा



पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे

पाटस:दौंड तालुक्यातील कसबे पाटस येथे एका संतापजनक घटनेत अज्ञात समाजकंटकांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाची आणि फलकाची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, यामुळे पाटस परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने दोषींवर तातडीने कारवाई न केल्यास पुणे-सोलापूर हायवेवर 'रस्ता रोको' करण्याचा इशारा ग्रामस्थ आणि जय मल्हार क्रांती संघटनेने दिला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील मुख्य रस्त्यालगत आणि गाववेस प्रवेशद्वाराजवळ आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. शनिवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी या स्मारकावर आणि नावाच्या फलकावर दगडफेक करून तोडफोड केली. तसेच जवळच असलेल्या 'जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य' या फलकाचेही नुकसान करण्यात आल्याचे दिसत आहे. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, हा प्रकार शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

​या घटनेच्या निषेधार्थ आज रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौक येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व रामोशी-बेरड समाज बांधव आणि शिव-शंभू प्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर प्रशासनाने संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक केली नाही, तर पुणे-सोलापूर महामार्गावर तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.