प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ओंकारखेडा येथे समुदाय अधिकार केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे ३० महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे आणि डॉ. सोयब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधत महिलांचे शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरण यावर आपले विचार मांडले. महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येऊन नेतृत्व करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुदाय अधिकार केंद्राच्या कार्याची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत किती सभासद (भागधारक) तयार झाले आहेत तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समुदायामध्ये कोणकोणते सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, याचा आढावा यावेळी देण्यात आला.
या वेळी मंचावर रंजना वानखडे, काजल पवार, मालिका पवार आणि सुनंदा भोसले उपस्थित होत्या. त्यांनी स्थानिक बोलीभाषेतून महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व अनुभव जाणून घेतले. तसेच समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून पुढील काळात महिलांसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबविता येतील, यावरही महिलांनी चर्चा करून काही दिशा ठरवल्या.
महिला दिनानिमित्त महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही सादरीकरण केले. जया पवार यांनी सादर केलेली “तू कमजोर नाहीस” ही प्रेरणादायी कविता विशेष लक्षवेधी ठरली आणि उपस्थित महिलांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवा पवार, मालिका पवार आणि अंजू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे हा महिलांचा कार्यक्रम असल्याने महिलांनीच पुढे येऊन आपले विचार मांडावेत, या उद्देशाने आयोजक टीममधील सदस्यांनी मंचावर न जाता महिलांना बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महिलांनी मनमोकळेपणाने आपले प्रश्न आणि मते व्यक्त केली.
यावेळी इकोनेटच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली. तसेच लवकरच आयोजित होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमाबाबत माहिती देत मातृत्ववंदन योजना, जननी सुरक्षा योजना आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपस्थित महिलांना करण्यात आले.
समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबवून फासे पारधी समुदायातील महिलांना एकत्र आणणे, त्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील सकारात्मक बदलासाठी दिशा देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
.jpg)




Social Plugin