Ticker

6/recent/ticker-posts

संरक्षक भिंत तुटल्याने अपघाताचा धोका.







फलटण-पुसेगाव महामार्गावर बुधमधील गावओढ्याच्या पुलावरील स्थिती

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

फलटण-पुसेगाव राज्य महामार्ग क्रमांक १४७वरील बुध हद्दीतील जवळपास वीस फूट खोली असलेल्या ओढ्याची संरक्षक भिंत गेल्या काही दिवसांपासून तुटली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी एखादा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुलाची संरक्षक भिंत जीर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर येथे कोणतीही दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे संरक्षण भिंतीचा जीर्ण झालेला भाग टप्प्याटप्प्याने ढासळत - आहे. सध्या संरक्षक भिंतीचा मोठा भाग पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे.

राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीसोबत परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. नव्याने रुंदीकरण करण्यात आल्याने वाहनांची गती वाढून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पुलाच्या एका बाजूला रस्त्यावर तीव्र उतार असून, येथे फाटा आणि तीव्र वळण देखील आहे. सद्यःस्थितीत पुलाची संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात ढासळल्याने रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांकडून पुलावरून वाहन चालवताना अंदाज चुकल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खोली जास्त असल्याने एखादे वाहन ओढ्यात पडून जीवितहानी होण्याची भीती देखील असल्याचे नागरिक सांगत आहेत.

त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर वाहनचालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करून पुलाची संरक्षक भिंत नव्याने बांधणे आवश्यक आहे.     छायाचित्र = बुध संरक्षक भिंत तुटल्याने धोकादायक बनलेला महामार्गावरील पूल. छाया= प्रकाश राजेघाटगे बुध