बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
अनपटवाडी (ता. वाई) येथे 14 मार्च रोजी सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला गेला. जयहिंद फाउंडेशन आणि ग्रामपंचायत अनपटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात संपूर्ण गाव 'विधवा प्रथा मुक्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. परंपरेच्या नावाखाली लादल्या गेलेल्या अनिष्ठ प्रथांना मूठमाती देत, वीरपत्नी आणि गावातील विधवा भगिनींना सन्मानाने हळदी-कुंकू लावून या क्रांतीचा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यावेळी शहीद स्मारकाचे लोकार्पण वीरपत्नी सौ. प्रियांकाताई नवनाथ दाभाडे, सौ. प्रियंकाताई सोमनाथ मांढरे आणि सैनिक पत्नी सौ. शारदाताई नंदकुमार अनपट यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ग्रामदैवत श्री वाकडेश्वर महाराज मंदिरात माजी सैनिक श्री. चंद्रकांत इंगळे यांच्या हस्ते आरती करुन मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वय वर्ष 94 असलेल्या आजी सुलोचना तुकाराम मांढरे. त्यांनी इतर 20 महिलांसह पारंपरिक बंधने तोडून उत्साहाने हळदी-कुंकवाचा मान स्वीकारला. वीरपत्नी प्रियांकाताई दाभाडे आणि प्रियांकाताई मांढरे यांचाही यावेळी सौभाग्याचे लेण देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या हृदयस्पर्शी दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले .
व्यासपीठावर दिशा अकॅडमीच्या संचालिका सौ. रुपालीताई कदम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सौ. शुभदा नागपूरकर, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या सौ. तनुजा इनामदार, बावधनच्या सरपंच सौ. वंदना कांबळे, डॉ. तृप्ती चक्के आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शुभदा नागपूरकर यांनी जयहिंद फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत या चळवळीत सक्रिय राहण्याचे आश्वासन दिले. तर डॉ. तृप्ती चक्के यांनी हुतात्मा सैनिक कुटुंबांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर सेवा देण्याचे जाहीर केले.
सौ. हेमलताई फडतरे यांनी उपस्थितांना विधवा प्रथा मुक्तीची शपथ दिली. यावेळी जयहिंद फाउंडेशनच्या वतीने बावधन ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना कांबळे यांना निवेदन देऊन, बावधन गावही विधवा प्रथा मुक्त करण्याबाबत विनंती करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सौ. मनीषा अरबुणे यांनी केले, तर सूत्रसंचालन हनुमंत मांढरे यांनी केले. खटाव, सातारा, बारामती आणि वाई येथील जयहिंद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्राथमिक शाळेत सर्व सत्कारमूर्ती आणि मान्यवरांच्या सहभोजनाने झाली.





Social Plugin