Ticker

6/recent/ticker-posts

फडतरवाडीतून जोतिबा पदयात्रेचे प्रस्थान



पंचक्रोशीतील भाविकांचा सहभाग; ३१ मार्च रोजी पालखी जोतिबा गडावर दाखल होणार

बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 फडतरवाडी (ता. खटाव) येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेला प्रारंभ झाला.गावातील भाविक, तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भक्त या यात्रेत सहभागी झाले असून संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे फडतरवाडीची मानाची सासनकाठी, जी विशेष सन्मानाने यात्रेत अग्रस्थानी नेली जाते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात यात्रेला सुरुवात झाली.

यात्रेचा नांदोशी, करवडी, केदारवाडी, व ऐतावडे प्रत्येक मुक्काम होणार आहे. त्या त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून यात्रेकरूंचे उत्साहात स्वागत केले जात असून भोजन, निवास व इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. फडतरवाडी व पंचक्रोशीतील हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. गावातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन आणि तरुणांच्या उत्साहामुळे यात्रा सुरळीत चालू आहे. ३१ मार्च रोजी ही पालखी जोतिबा गडावर पोहोचणार असून त्या दिवशी विशेष पूजन व धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सोहळ्याची तयारीही मोठ्या उत्साहात सुरू आहे. ही पदयात्रा केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक मानली जाते. एकत्र येऊन श्रद्धा, सेवा आणि परंपरा जपण्याचा हा सुंदर वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या यात्रेमुळे घडत आहे.     छायाचित्र _ फडतरवाडी  जोतिबा दर्शनासाठी पदयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.