प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर :
इकोनेट संस्थेच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी, मंगरूळ चव्हाळा व सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच चोर माहुली, धानोरा गुरव, धानोरा फसी, वडूरा, मंगरूळ चव्हाळा या उपकेंद्रांमधील आरोग्य सेवांचा मागील सहा महिन्यांपासून सखोल अभ्यास करण्यात आला होता.
या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, आरोग्य विभाग व प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी दिनांक १८ मार्च रोजी पदमपाणी मंगलम, नांदगाव खंडेश्वर येथे तालुका स्तरीय आरोग्य जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे, सह गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, इकोनेट संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरीताई भोपटकर, राहुल साळवी, सुनिता देशमुख, मेडिकल ऑफिसर नितेश हारळकर (मंगरूळ चव्हाळा), गुल्हाने सर (लोणी), मुकेश पारडे सर (द्यमक) यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी, अपेक्षा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर चांदूरकर, समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष बाबूसिंग पवार, सुनील धनविजय, पत्रकार उमेश चौकुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकारखेडा, शिरपूर, धानोरा फसी, वडूरा, हिंगलाजपूर, हिवरा, मुरादे, सावंगी, रोहना, बहिलोरपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा आदी गावांमधून सुमारे ३५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
जनसंवाद सत्रात नागरिकांनी आरोग्य सेवा घेताना येणाऱ्या अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणारे प्रश्न, अॅम्ब्युलन्स सेवा, दळणवळण समस्या, औषधांची उपलब्धता तसेच आरोग्य केंद्रांतील सुविधा याबाबत आपले अनुभव मांडले. विशेष म्हणजे महिलांनीही पुढाकार घेत आपले प्रश्न ठामपणे मांडले.
या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी उपस्थित अडचणी लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील व नागरिकांना शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, लसीकरण कार्यक्रम तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. तसेच इकोनेट संस्थेने मागील सहा महिन्यांत तयार केलेल्या अभ्यास अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.
या जनसंवादामुळे नागरिक, प्रशासन व आरोग्य विभाग यांच्यात थेट संवाद साधला गेला असून आरोग्य सेवांमधील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशासाठी रंजनाताई वानखडे, छायाताई जाधव, रेखा कराड, काजल पवार, अभय पवार, सागर पवार, शिवा पवार, उमेश पवार, हिना पवार, संदीप अंभोरे तसेच इकोनेट टीम व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. अति जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
एकंदरीत, हा कार्यक्रम आरोग्य व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची मजबूत सुरुवात ठरला.





Social Plugin