Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक जिल्ह्यात 9 मे रोजी होणार लोक अदालत



नाशिक ,प्रतिनिधी ,

जकीया शेख ,

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 9 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व वाद मिटविण्यासाठी या लोकअदालतीत सहभाग घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी केले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सुहास भोसले यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोक अदालतीत मोटार अपघात दावा प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, बँक व वित्तीय संस्थांची कर्जवसूली प्रकरणे, वीज चोरी व वीज देयकांबाबतची प्रकरणे, कौटुंबिक व वैवाहीक वाद (घटस्फोट वगळून), कामगार व वेतनविषयक वाद, भाडे, मालमत्ता व इतर दिवाणी स्वरूपाची प्रकरणे, फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे, दाखलपूर्व वाद प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात येणार आहेत.

लोक अदालतीच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, महावितरण, जिल्हा परिषद, विमा कंपनीचे पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व विविध शासकीय कार्यालये यांच्यासोबत योग्य प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी बैठका घेण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणे निकाली निघाल्यास तो निर्णय अंतिम असल्याने त्यावर अपील नाही. तसेच न्यायालयीन शुल्क भरले असल्यास ते संबंधित पक्षकारांना परत मिळते. तसेच प्रकरणे लोक अदालतीत मिटल्याने पक्षकारांचा पैसा, वेळ वाचतो. जिल्ह्यातील वरील प्रकरणांशी संबंधित सर्व पक्षकार, वकील वर्ग, वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी लोक अदालतीत सहभाग नोंदवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अधिक माहितीसाठी 8591903615 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री रोकडे यांनी केले आहे.