बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
बुध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून लता अविनाश कर्णे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक स्वाभिमानी जनतेने मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली होती. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा गड कायम राखत मतदारांनी महेश शिंदे यांच्या विरोधातील भावना मतदानातून स्पष्टपणे व्यक्त केल्या होत्या.
मात्र, निवडून आल्यानंतर लता कर्णे यांनी राष्ट्रवादी पक्षाशी एकदा नव्हे तर दोन वेळा गद्दारी केली आहे. त्या आणि त्यांच्या भोवतालचे कोण-कोण फुटले आहे, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. या सर्व प्रकरणात तब्बल १० कोटींची डील झाली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
डिस्कळ येथे लता कर्णे यांच्या निषेधार्थ मोर्चादरम्यान आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, जोतीनाना सावंत, राहुल पाटील, बाळासाहेब इंगळे, संजय चव्हाण, मानाजी घाडगे, राजेंद्र घाटगे, राजेंद्र कचरे, गौरव जाधव, दत्तात्रय गोडसे यांच्यासह बुध जिल्हा परिषद गटातील व डिस्कळ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषद राजकारणात बुध गटातील घडामोडींनी मोठा राजकीय भूकंप घडवून आणला असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी लता अविनाश कर्णे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल चढवला आहे. “ही केवळ राजकीय भूमिका बदलण्याची बाब नाही, तर जनतेच्या विश्वासाशी केलेली उघड गद्दारी आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
शिंदे म्हणाले की, बुध जिल्हा परिषद गटातून लता कर्णे यांना उमेदवारी देताना पक्षाने आणि स्थानिक नेत्यांनी मोठा विश्वास दाखवला होता. डिस्कळ पंचायत समितीतून डॉ. माधवी महेश पवार यांची निवड सुनिश्चित व्हावी, या व्यापक राजकीय समीकरणातूनच पांडुरंग गोडसे, डॉ. महेश पवार आणि उदय शिंदे यांच्या आग्रहाखातर कर्णे यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामागे हेच एकमेव उद्दिष्ट होते. स्वाभिमानी जनतेनेही राष्ट्रवादीच्या विचारांवर विश्वास ठेवत कर्णे यांना विजयी केले. मात्र, ज्या उद्देशासाठी त्यांना संधी देण्यात आली, तो उद्देश साध्य झाला नाहीच; उलट विजयाचा गुलाल सुकण्याआधीच त्या भाजपच्या संपर्कात गेल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असताना, नैसर्गिकरित्या ओबीसी असलेल्या लता कर्णे यांनाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि स्वतः मी आग्रही होतो. सुरुवातीला लता कर्णे यांचे पती अविनाश कर्णे यांनी “कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र अचानक असा काय ‘चमत्कार’ घडला की राष्ट्रवादीची टोपी डोक्यावर असतानाच त्या थेट उटी येथे जाऊन भाजपमध्ये सामील झाल्या? “त्यांना उटीतून कोण घेऊन गेले, त्याचे व्हिडिओ आहेत, हे संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे,” असा थेट सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, गेली पंधरा वर्षे पांडुरंग गोडसे, डॉ. महेश पवार आणि उदय शिंदे यांना भावाप्रमाणे वागणूक देत त्यांच्यामार्फत डिस्कळमध्ये राजकारण केले. मात्र, या सर्वांनी वैयक्तिक स्वार्थासाठी नेत्याशी आणि पक्षाशी गद्दारी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी लता कर्णे यांनी पहिली गद्दारी केली आणि त्याचे बक्षीस म्हणून भाजपकडून डिस्कळच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यानंतरही पक्षाने त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. “सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिल्यास महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद देऊ,” असा प्रस्ताव देऊन मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्याशी चर्चा करून हिरवा कंदीलही मिळवला होता. मात्र, कर्णे यांनी दुसऱ्यांदा गद्दारी करत भाजपला मतदान केले आणि स्वतःसाठी कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद मिळवले. “ही केवळ विश्वासघातकी राजकारणाची पराकाष्ठा आहे,” अशी टीका त्यांनी केली
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर स्वतःचे पाप झाकण्यासाठी लता कर्णे आणि पांडुरंग गोडसे डॉ. महेश पवार, उदय शिंदे यांच्याकडून स्वतःचं पाप झाकण्यासाठी दुसऱ्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे त्यांचे केविलवाणे प्रयत्न आहेत. पक्षाशी आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना आम्ही कायमचे बेदखल केले आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. जनतेने अशा त्या गद्दारांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानावेळी पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली, तर कामेश कांबळे यांना एक मंत्री, नगराध्यक्ष, नगरसेवक दबाव आल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर “कॅमेरे बंद होते” असे सांगण्यात येणे, ही प्रशासनाची गंभीर बाब असल्याची टीकाही करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच राजीव शिपटे, सूत्रसंचलन ज्ञानेश्वर जगताप तर आभार मेघराज निकम यांनी मांडले.
गद्दारीनंतर नैतिकतेची परीक्षा; लता कर्णेंनी राजीनामा द्यावा : शिंदे
लता अविनाश कर्णे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर बुध जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि जनतेने प्रचंड पाठिंबा दिला. हे यश वैयक्तिक नसून पक्षनिष्ठा आणि जनतेच्या विश्वासाचं फलित आहे. त्यामुळे त्या सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, ही आमची ठाम मागणी आहे. स्वतः अविनाश कर्णे यांनीही मला सांगितले खूप टेन्शन आलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीनंतर राजीनामा देण्याची भूमिका व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाशी गद्दारी करून ते शब्दापासून मागे फिरले आहेत. जर खरंच नैतिकता असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावं. त्यानंतरच त्यांची समाजातील खरी उंची आणि जनाधार किती आहे, हे स्पष्ट होईल.आ.शशिकांत शिंदे
*खोटारड्या आमदारांना नोबेल पुरस्कार द्यावा लागेल : घार्गे*
खटाव तालुका ही हुतात्म्यांची पवित्र भूमी असून बुध गटातील जनतेने कायम पुरोगामी विचारांना साथ देत भाजपच्या विचारांना ठाम नकार दिला आहे. मात्र, लता कर्णे यांनी जनतेच्या विश्वासाला तडा देत राष्ट्रवादीशी उघड गद्दारी केली आणि जातीयवादी भाजपचा हात धरला, हे जनता कदापी माफ करणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत जनादेश राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट होता, तरीही भाजपने प्रशासनाचा गैरवापर करून लोकशाहीचा खून केला. सत्तेच्या हव्यासापोटी जनमताचा अपमान करण्यात आला आहे. त्याचबरोबर येथील आमदारांची भूमिका इतकी खोटी आणि दिशाभूल करणारी आहे की, त्यांना खोटे बोलण्याचे नोबेल पारितोषिक द्यावे लागेल, असा सडेतोड आणि खोचक टोला आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता लगावला. प्रभाकर घार्गे, माजी आमदार सांगली सातारा विधान परिषद.
लता कर्णेंकडून फुले विचारांना तिलांजली : विधाते
लता अविनाश कर्णे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊनही सत्तेच्या उंबरठ्यावर महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांना तिलांजली देत भाजपचा हात धरतात, ही उघड गद्दारी आहे. ओबीसी महिला म्हणून अध्यक्षपदाची संधी असताना त्यांनी स्वार्थी राजकारणाची वाट निवडली. डिस्कळ येथे अध्यक्ष पदाच्या विजयी सभेऐवजी निषेधसभा घ्यावी लागणे ही लोकशाहीची थेट खिल्ली आहे. खऱ्या अर्थाने लता कर्णे यांच्याकडे राजकीय सुसंस्कृतता असता, तर हा विश्वासघात झाला नसता. जातिवादाविरुद्ध लढणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांशी प्रतारणा करत त्यांनी इतिहासात काळा डाग उमटवला आहे. साताऱ्याच्या राजकारणात त्यांची नोंद ही गद्दारीच्या काळ्या अक्षरांतच राहील.प्रदीप विधाते, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा.





Social Plugin