पाटस प्रतिनिधी-गणेश गावडे
पाटस: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात एका हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १४) पहाटे घडली आहे. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पाटस पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाटस येथील 'हॉटेल सह्याद्री' लगत असलेल्या 'अमृत गार्डन' हॉटेलमध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव विश्वास बबन उघडे (वय ३१, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आहे. विश्वास उघडे हे हॉटेलमध्ये झोपलेले असताना, आरोपीने पूर्ववैमनस्य आणि घरगुती वादातून मनात राग धरून त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने उघडे यांचा मृत्यू झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पाटस पोलिसांनी अशरफ अस्लम शेख (वय २४, मूळ रा. सदर बाजार, सातारा; सध्या रा. हॉटेल सह्याद्री जवळ, पाटस, ता. दौंड) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेबाबत सारिका सचिन गपाट (सध्या रा. पाटील वस्ती, केसनंद, वाघोली, ता. हवेली; मूळ रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करत आहेत.
पुणे-सोलापूर हायवेवरील वर्दळीच्या भागात अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





Social Plugin