Ticker

6/recent/ticker-posts

“गणवेश सक्तीवर लगाम घाला!” – सामाजिक कार्यकर्त्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी



शिरूर (पुणे) :

खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांवर गणवेशाच्या नावाखाली होत असलेल्या आर्थिक लुटीविरोधात शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धडक दिली आहे. या संदर्भात त्यांनी विविध शासकीय विभागांसह थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनाही सविस्तर ईमेल पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

सदर मेल पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शिरुर पंचायत समिती शिक्षण विभाग, पुणे शिक्षण अधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यासोबतच थेट राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना देखील पाठवण्यात आला आहे.

सध्या अनेक खासगी शाळांकडून दरवर्षी नवीन गणवेश खरेदी करण्याची सक्ती केली जात असून, काही ठिकाणी विशिष्ट दुकानातूनच गणवेश घेण्याचा दबाव टाकला जातो. यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यात अलीकडेच 5 वर्षांपर्यंत गणवेश बदलास बंदी घालण्याचा आणि विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती केल्यास ₹5 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय लक्षात घेता महाराष्ट्र राज्यातही तत्सम कठोर नियम लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाधव यांनी आपल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत—

* किमान 5 वर्षांपर्यंत गणवेश बदलण्यास बंदी घालावी

* विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करावी

* नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर ₹5 लाखांपर्यंत दंड आकारावा

* जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवावी

* पालकांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी

या प्रकरणामुळे शिरूरसह पुणे जिल्ह्यातील पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासन आणि शिक्षण विभाग यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासगी शाळांच्या मनमानीला आळा बसावा, अशी सर्वसामान्य पालकांची अपेक्षा आहे.