प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्वर
दि. १ एप्रिल २०२६ रोजी तालुक्यातील ओंकारखेडा येथील समुदाय अधिकार केंद्रात क्रांतिवीर शमशेरसिंग भोसले यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात परिसरातील महिला व मुलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थित मान्यवरांनी शमशेरसिंग भोसले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमा दरम्यान त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्याची आणि त्यांच्या अदम्य धैर्याची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने शिक्षण, हक्क आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.यावेळी महिलांनी व मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून अशा उपक्रमांचे आयोजन करून फासे पारधी समाजात इतिहासाची जाणीव, एकजूट आणि नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.या कार्यक्रमाला डॉ. उमेश चौकडे, डॉ. भूषण पोतदार, नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे, शिवा पवार, प्रशांत पवार, काजल पवार, आरती भोसले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin