शिरुर : महाराष्ट्र राज्यभरातील शाळांमध्ये दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या “मास्टर आर्ट कॉम्पिटीशन” या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत यंदाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या स्पर्धेत शिरुर शहराने यंदा विशेष यश संपादन करत आपली छाप उमटवली आहे.
शिरुर शहरातील विजयमाला विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल येथील इयत्ता दहावीतील कु. गिरीजा गिरीष तिकोणे हिने उत्कृष्ट कलाकृती सादर करत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह संपूर्ण शिरुर शहराचा मान उंचावला असून, सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“मास्टर आर्ट कॉम्पिटीशन” ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारी आणि त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणारी महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते व आत्मविश्वास वाढीस लागतो.
गिरीजाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचा सन्मानचिन्ह व मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला. तिच्या या यशामागे तिची जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावासोबतच तिचे वडील गिरीष तिकोणे आणि चित्रकला शिक्षिका भारती पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगितले जात आहे.
या यशामुळे विजयमाला विद्या मंदिर शाळेचे नाव राज्यभर उजळले असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही गिरीजा प्रेरणास्थान ठरली आहे. शाळेच्या वतीने तसेच नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin