Ticker

6/recent/ticker-posts

लोकप्रतिनिधींच्या केवळ पाण्याच्या भूलथापा : प्रताप जाधव




पुसेगाव येथे रास्ता रोको दरम्यान घणाघात

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांना पाण्याची हमी देत दिलेली आश्वासने आता फोल ठरल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केला. नेर तलाव तुडुंब भरलेला असतानाही येरळा नदी व नेर कॅनाल महिन्यांपासून कोरडे पडली आहेत, त्यामुळे उन्हाच्या झळांनी ऊस आणि बागायती पिके अक्षरशः जळून खाक होत आहेत. खटाव तालुक्यातील शेतकरी पाण्याअभावी हवालदिल झाले असताना, त्यांच्या हक्काचे पाणी आंधळी धरणात वळवले जात असल्याने संताप उसळला आहे. “भूलथापा देणाऱ्यांना शेतकरी कधीच माफ करणार नाहीत,” असा थेट इशारा जाधव यांनी दिला.

पुसेगाव (ता. खटाव) येथे नेर तलावातून येरळा नदी व निर्मला कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख भानुदास कोरडे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहिते, खटाव तालुकाप्रमुख संजय नांगरे, यशवंत जाधव, राघू जाधव , मुगुटराव कदम , सुमित्रा शेडगे , अनिता काळे , अस्लम शिकलगार , गणपती लावंड , विश्वास नलवडे , संजय नलवडे , विठ्ठल बोटे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप जाधव, गणेश जाधव, धिरज जाधव , निलेश जाधव , प्रवीण देवकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.

प्रताप जाधव यांनी बोलताना सांगितले की, खटाव तालुका हा पारंपरिक दुष्काळी भाग असून येथील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावे, हे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. १९९५ मध्ये युती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पुढाकारातून तत्कालीन मुख्यमंत्री  मनोहर जोशी यांनी १९९७ मध्ये जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. या योजनेचा पाया शिवसेनेच्या धोरणांमुळेच रचला गेला असून सन  २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही योजना पूर्णत्वास गेल्याचा दावा त्यांनी केला.  

जिहे-कठापूर योजनेला गती मिळावी यासाठी खटाव तालुक्यातील शिवसैनिकांनी सातत्याने आंदोलने आणि रास्ता रोको केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र सध्या नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असतानाही पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय द्वेषापोटी सत्ताधारी लोकप्रतिनिधी पाणी सोडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

भानुदास कोरडे आणि अर्जुन मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी चौकात शिवसैनिकांनी वाळलेल्या उसाला आग लावून सत्ताधारी व प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.

...........कोट...........

१ मे रोज येरळा नदी पाणी सोडणार :  डीसले 

नेर तलावातील पाणी येरळा नदी व नेर कॅनालमध्ये सोडण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे. कृष्णा सिंचन विभागाचे उपअभियंता प्रशांत डीसले यांनी शिवसैनिकांना दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता शिंदे यांच्या निर्देशानुसार येत्या १ मे रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दीर्घकाळापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी सोडले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

..........चौकट.........

शिवसैनिकांवर रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल 


पुसेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथे 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.25 ते 11.37 दरम्यान सातारा–लातूर राष्ट्रीय महामार्ग (NH 548E) वर बेकायदेशीर रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप सुभाष जाधव, मुगुटराव कदम, अर्जुन विठ्ठल मोहिते, भानुदास तरडे, अस्लम शिकलगार, कन्हैया आगसे, संजय नांगरे यांच्यासह 10 ते 15 जणांनी परवानगीशिवाय जमाव जमवून वाहतूक अडवली. आंदोलनकर्त्यांनी वाळक्या उसाच्या मोळ्या व भुसा पेटवून ज्वलनशील पदार्थांचा वापर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

छायाचित्र .: पुसेगाव येथे नेर तलावातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी करपलेल्या उसाचे दहन करत आंदोलन केले. यावेळी प्रताप जाधव, भानुदास कोरडे, अर्जुन मोहिते आणि यशवंत जाधव उपस्थित होते. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध