Ticker

6/recent/ticker-posts

भूम येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात



आसिफ शेख @तालुका प्रतिनिधी 

15 मे 26 भूम 

भूम : शहरासह तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात कसबा विभागातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक अहिल्यानगर रोडवरील जिजाऊ नगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात व युवा नेते साहिल गाढवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ही मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.

    या मिरवणुकीमध्ये सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा पालखीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे हत्तीवर अंबारीत बसून दक्षिणेच्या स्वारीला निघालेले, त्यानंतर मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आसनस्थ झालेले, रायगडावर सिंहासनावर विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर अश्वावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज व बाल संभाजी महाराज, आरमार दलाची प्रतिकृती, ब्रम्होस क्षेपणात्राची प्रतिकृती आदींनी या मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीतील पारंपरिक वाद्य हलगीने अधिकच शोभा वाढविली होती.

    शहरातील प्रमुख मार्गावरून ही भव्य मिरवणूक शांततेत पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्यासह सपोनि संजय झराड, अख्तर सय्यद यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.