

नेवासा | प्रतिनिधी:
जगाचा निरोप घेताना ज्याच्या मागे कुणीही नव्हते, अशा एका 'अनाथ' देहाचे नातेवाईक होऊन 'शिवमुद्रा' टीमने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. नेवासा फाटा परिसरात अपघातात मृत्यू झालेल्या एका अनोळखी व्यक्तीवर शिवमुद्रा ॲम्ब्युलन्स सेवा आणि संस्थापक विकासभाऊ निपुंगे यांनी स्वखर्चाने आणि पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार पार पाडले.
नेमकी घटना काय?
काल नेवासा फाटा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांच्या दप्तरी केवळ 'अज्ञात' अशी नोंद झाली होती. नातेवाईकांचा शोध लागला नाही आणि ओळखही पटली नाही. अशा कठीण प्रसंगी मृतदेहाचे काय करायचे, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा असताना शिवमुद्रा ॲम्ब्युलन्स मदतीला धावून आली.
शिवमुद्राची कौतुकास्पद भूमिका
घटनेची माहिती मिळताच संस्थापक विकासभाऊ निपुंगे यांनी कोणतीही फी न आकारता संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते शवविच्छेदन आणि कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी स्वतः पूर्ण केली. केवळ औपचारिकता न पाळता, एका माणसाला मिळायला हवा तसा सन्मान देत या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशासकीय सहकार्य आणि जनभावना
या अंत्यविधीला नगरपंचायत कर्मचारी, पोलीस बांधव आणि शिवमुद्राची संपूर्ण टीम उपस्थित होती. "अॅम्ब्युलन्स फक्त जिवंत माणसांना रुग्णालयात नेण्यासाठी नाही, तर मृत्यूनंतरही माणसाचा सन्मान जपण्यासाठी आहे. ज्याला जग अनाथ म्हणतं, त्याचे आम्ही नातेवाईक झालो," अशी भावना विकास निपुंगे यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवमुद्रा ॲम्ब्युलन्स नेवासा फाटा परिसरात २४ तास मोफत सेवा देत आहे. मग तो अपघात असो, आजारपण असो की अंत्यविधी, गरजेच्या वेळी धावून जाणे हे या संस्थेचे ब्रीदवाक्य ठरले आहे. या मानवतावादी कार्याबद्दल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून शिवमुद्रा टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वृत्त संकलन: शरद धाडगे
अहिल्यानगर ग्रामीण न्यूज प्रतिनिधी




Social Plugin