Ticker

6/recent/ticker-posts

शॉर्ट सर्किटमुळे शेताला भीषण आग; लाखोंचे नुकसान




प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ओंकारखेडा येथील घटना

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ओंकारखेडा येथे शॉर्ट सर्किटमुळे शेताला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 08 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारखेडा येथील सर्वे नंबर 37/2 मधील शेतामध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गजानन मारोटकर यांना आग दिसून येताच त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच अग्निशमन दलाला संपर्क साधून मदत मागवली.

या आगीत बीज वाला कांदा, चाळ, स्पीकर पाइप, जनावरांचा चारा, कुटार, पाण्याची टाकी, ताळपत्री तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. याशिवाय टीनाचे शेड, मोटार, ठिबक सिंचन साहित्य यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर आगीत अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अतुल तऱ्हेकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गावातील संदीप दुधे, दिलीप ब्राम्हणवाडे, ईश्वरदास पोपळे, नितीन राऊत, साहेबराव शिंदे, सुरेशराव उडबगले, राहुल उडबगले आदी नागरिकांनीही मदतकार्य केले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

दरम्यान आग विझवताना संदीप दुधे, लोकेश उडबगले व रमेश उडबगले हे जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून तलाठी, कृषी अधिकारी व पोलिसांना कळविण्यात आले आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी रमेश उडबगले, लोकेश उडबगले व सुरेश उडबगले यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच शेतामधून गेलेले इलेक्ट्रिक पोल व वायर तातडीने हटविण्यात यावेत, अन्यथा भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.