बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पुसेगावमध्ये दररोज हजारो भाविक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असते. दिवसाला सुमारे ३०० एस.टी. बसेस या गावातून ये-जा करतात. मात्र, गेल्या ३२ वर्षांपासून येथे सुसज्ज बस स्थानक नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना उघड्यावर करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर आता 'श्री सेवागिरी व्यापार पेठ संघटना' आक्रमक झाली असून, संस्थापक *धीरज जाधव* यांनी महसूल प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
*प्रशासकीय दिरंगाईचा फटका*
पुसेगाव येथील बस स्थानकासाठी १९९४ मध्ये जागेची कबजेपट्टी करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आजही या जागेची ७/१२ नोंदणी पूर्ण झालेली नाही. गट नंबर ४११ चे रेकॉर्ड एस.टी. महामंडळाच्या नावे क्लिअर असतानाही, केवळ तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडले आहे.
*निधी असूनही काम ठप्प*
या प्रकल्पासाठी शासनाकडून ७० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. निधी उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय प्रक्रियेअभावी प्रवाशांची सोय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "प्रशासनाने तात्काळ या जागेची नोंदणी पूर्ण करून बस स्थानकाचे काम हाती घ्यावे, जेणेकरून प्रवाशांची कायमस्वरूपी त्रासातून मुक्तता होईल," अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
> *तीव्र आंदोलनाचा इशारा*
> "गेल्या अनेक वर्षांपासून पुसेगावकर आणि भाविक बस स्थानकाची वाट पाहत आहेत. जर महसूल प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर पुसेगाव महसूल कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा युवा नेते धीरज जाधव यांनी दिला आहे.





Social Plugin