प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर : आज दि. 10/05/2026 रोजी सायंकाळी अंदाजे 8:00 वाजताच्या सुमारास अमरावती–यवतमाळ महामार्गावर अमित रेस्टॉरंटसमोर भीषण अपघात घडला. टाटा मिनी ट्रॅव्हल बस क्र. TS 07 UL 2576 ही नांदगाव खंडेश्वर शहराकडून यवतमाळच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोर असलेल्या मोटारसायकल क्र. MH 27 S 0209, टाटा मिनी पिकअप क्र. MH 27 BX 7249 तसेच स्विफ्ट कार क्र. MH 04 FA 6834 यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना तत्काळ नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची अपुरी सुविधा असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात केवळ एकच रुग्णवाहिका उपलब्ध असून ती प्रामुख्याने प्रसूतीसाठी वापरली जाते, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर उपचारासाठी हलविताना अडचणी निर्माण झाल्या.
या घटनेनंतर काही नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. अविनाश ब्राम्हणवाडे, सतीश पटेल, शुभम जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी फोनद्वारे पाठपुरावा केल्यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली व जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.





Social Plugin