Ticker

6/recent/ticker-posts

गाव तेथे 'साऊ' शासकीय प्रशिक्षण उपक्रम पुण्यात उत्साहात संपन्न .

 

समाजकल्याण योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी २०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग.

पुणे येथील नेल्सन वाडिया कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारा 'गाव तेथे साऊ' हा महत्त्वाकांक्षी शासकीय प्रशिक्षण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली मॅडम, सायली मॅडम, गुणवंत सर तसेच संदीप सर यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजातील दुर्बल, वयोवृद्ध, महिला, विधवा, परित्यक्ता तसेच ट्रान्सजेंडर घटकांपर्यंत शासनाच्या विविध समाजकल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात या उद्देशाने 'गाव तेथे साऊ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशाल लोंढे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रातील विविध भागांतून २०० हून अधिक स्वयंसेवकांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. यावेळी प्राचार्या वृषाली मॅडम यांनी उपस्थित स्वयंसेवकांना समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. ही दरी दूर करण्यासाठी स्वयंसेवक गावागावात जाऊन योजनांची माहिती देणे, अर्ज प्रक्रिया समजावून सांगणे तसेच लाभार्थ्यांच्या अडचणींचे स्थानिक स्तरावर निराकरण करणे, यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात येत आहे. समाजकल्याण विभागाचा 'पुणे पॅटर्न' राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, 'साऊ'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सायली मॅडम व विशाल लोंढे यांनी महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांसह सर्व सहभागी स्वयंसेवकांचे आभार मानले.