बुध दि (प्रकाश राजेघाटगे):
शासकीय नियमांनुसार अतिरिक्त साठा करून चढ्या दराने विक्री होऊ नये म्हणून सर्वसामान्य वाहनधारक, शेतकरी आणि व्यावसायिक यांना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाने राजपत्रात (The Gazette of India) स्पष्टपणे नमूद केले आहेत. परंतु, या नियमांना हरताळ फासत नेर फाटा येथील 'इंडियन ऑईल श्रीनिधी पेट्रोलियम' या पेट्रोल पंपावर सर्वसामान्य वाहनधारकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अडचणीत सापडलेल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारकांना अवघ्या १०० रुपयांचे पेट्रोल देण्यास येथील व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, त्याच वेळी आपल्या जवळच्या किंवा संबंधित लोकांना २० ते ३५ लीटरचे कॅन भरून दिले जात असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी व्यक्त केल्या आहेत.
**नियम पायदळी तुडवत कर्मचाऱ्याचा मोबाईलवर बोलतानाचा कारनामा कॅमेऱ्यात कैद**
दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ९:४० वाजण्याच्या सुमारास या पंपावर एका ग्राहकाला चक्क ३५ लीटरचा कॅन भरून दिला जात होता. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पेट्रोल पंपावर सुरक्षिततेच्या कारणास्तव ग्राहकांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असताना, येथील कर्मचारी स्वतः इंधन भरताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणामुळे पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराला मालक विवेक चव्हाण यांची मूकसंमती आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
**लहान मुलीला दवाखान्यात नेतानाही दाखवली नाही दया; मालकाची उर्मट भाषा**
यापूर्वीही रात्री ११ च्या सुमारास एका ग्राहकाने आपल्या ४५ दिवसांच्या लहान मुलीला तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी पेट्रोल मागितले असता, '११ नंतर पंप बंद होतो' असे सांगून कर्मचाऱ्यांनी अत्यंत उर्मट भाषेत पेट्रोल देण्यास नकार दिला. मुलीची तब्येत बिघडलेली असताना आणि ती रडत असतानाही कर्मचाऱ्यांना किंचितही दया आली नाही. अखेर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीसही यावर निरुत्तर झाले.
या संपूर्ण गंभीर प्रकाराबाबत पत्रकार निसार शिकलगार यांनी स्वतः श्रीनिधी पेट्रोलियमचे मालक विवेक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, "तुम्ही कितीही अडचणीत असला तरी पेट्रोल मिळणार नाही" अशी उर्मट आणि बेजबाबदार भाषा त्यांनी वापरली.
**कायदेशीर कारवाईची मागणी**
शासकीय राजपत्रातील नियमांचे उल्लंघन करून काळाबाजार आणि साठेबाजीला खतपाणी घालणाऱ्या, ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या 'श्रीनिधी पेट्रोलियम'च्या मालकावर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पत्रकार निसार शिकलगार आणि त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.





Social Plugin