Ticker

6/recent/ticker-posts

रेवलकरवाडीचे माजी उपसरपंच हनुमंत कदम यांचे अल्पशा आजाराने निधन



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

रेवलकरवाडी ता. खटाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि गावच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते श्री. हनुमंत माणिक कदम यांचे काल शुक्रवारी रात्री ९:३० वाजता कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्षे होते. त्यांच्या निधनाने रेवलकरवाडी आणि खटाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हनुमंत कदम हे १९९५ च्या काळात रेवलकरवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी गावच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. तत्कालीन वैज्ञानिक विकास महामंडळ (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांच्या फंडातून डोंगरी भागातील गावासाठी ५ किलोमीटरचा डांबरी रस्ता मंजूर करून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याच हस्ते या रस्त्याचे भूमीपूजन झाले होते, ज्यामुळे डोंगरी गावांमध्ये एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यासोबतच त्यांनी 'वन संरक्षण समिती'चे अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय काम पाहिले.

हनुमंत कदम हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक उत्कृष्ट कबड्डीपटू आणि उत्तम लेझिम व ढोल-ताशा वादकही होते. गावातील सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. गावातील प्रत्येक गरजू माणसाला धावून जाणे आणि मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव होता. त्यांच्या याच मिळनसार आणि परोपकारी स्वभावामुळे ते जनमानसात अत्यंत लोकप्रिय होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व. हनुमंत माणिक कदम यांच्या पार्थिवावरील सावडण्याचा विधी उद्या रविवारी (दिनांक २८ जून) सकाळी ठीक ८:०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, रेवलकरवाडीयेथे पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.