Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई



 खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

अवैध धंद्यांविरुद्ध पुसेगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, खटाव गावाजवळील सिरस वस्ती लगत असलेल्या मळवी शिवारात पोलिसांनी हातभट्टीवर मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मळवी शिवारात अवैध हातभट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मळवी शिवारातून खालील तपास मुद्देमाल जप्त केला.गुळमिश्रित रसायन ९ प्लास्टिक बॅरल्समध्ये भरलेले एकूण २२५ लिटर गुळमिश्रित रसायन (किंमत रु. १,००,०००/-)हातभट्टी दारू ५ लिटर क्षमतेचे २ कॅन, ज्यामध्ये एकूण १० लिटर हातभट्टी दारू होती (किंमत रु. १,०००/-)

पोलिसांनी एकूण १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, त्यातील रसायन जागीच नष्ट केले आहे. याप्रकरणी आरोपी शरद संजय जाधव (वय ३०, रा. खटाव, ता. खटाव) याच्याविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गु.रं.नं. १५२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (इ)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची धडक कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती तेरणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  नागनाथ खुणे, पोलीस हवालदार विपुल भोसले, तात्यासाहेब ढोले, पोलीस कॉन्स्टेबल शंकर सुतार, दर्याबा नरळे, अविनाश घाडगे आणि होमगार्ड बकरे यांच्या पथकाने केली.

सपोनि नागनाथ खुणे यांचे आवाहन.  या धडक कारवाईनंतर पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, "आपल्या गावात किंवा परिसरात कुठेही अशा प्रकारे अवैध हातभट्टी किंवा इतर बेकायदेशीर धंदे सुरू असतील, तर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ व गोपनीय रित्या माहिती देऊन सहकार्य करावे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव संपूर्णपणे  गोपनीय ठेवण्यात येईल.