Ticker

6/recent/ticker-posts

दौंड तालुक्याचा सुपुत्र डॉ. तुषार दिलीप हाके यांना दिल्लीत डॉक्टरेट पदवी प्रदान



केडगाव स्टेशन (ता. दौंड) प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुषार दिलीप हाके यांना दिल्ली येथे त्यांच्या कृषी संशोधन, नैसर्गिक शेती प्रसार आणि सामाजिक योगदानाची दखल घेत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या उल्लेखनीय यशामुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान डॉ. हाके यांनी देशातील अग्रगण्य कृषी संशोधन संस्था Indian Council of Agricultural Research (ICAR) आणि Indian Agricultural Research Institute (IARI) येथे भेट देऊन विविध संशोधन प्रकल्पांचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी अनेक नामवंत कृषी शास्त्रज्ञांशी संवाद साधून हवामान बदल, उत्पादन खर्च कमी करणे, नैसर्गिक शेती, मृदा संवर्धन, जलव्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

तसेचदेशातील विविध मान्यवर, धोरणकर्ते आणि मंत्र्यांशी शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीतील नवतंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवरही त्यांनी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी या भेटीदरम्यान केला.

डॉ. तुषार हाके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांना रासायनिक शेतीपासून पर्यावरणपूरक शेतीकडे वळविण्यासाठी त्यांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी मेळावे, मार्गदर्शन शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

या सन्मानाबद्दल बोलताना डॉ. तुषार हाके म्हणाले, "हे यश केवळ माझे नसून संपूर्ण शेतकरी समाजाचे, माझ्या कुटुंबाचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. माझ्या वडिलांकडून मिळालेली प्रेरणा आणि शेतीविषयीची जिद्द यामुळेच मी संशोधन व समाजकार्यात पुढे जाऊ शकलो. शेतकऱ्यांच्या हितासाठी मी अहोरात्र कार्य करत राहणार असून शेती क्षेत्रात नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान गावागावांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन."

दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी डॉ. हाके यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले असून, त्यांच्या या सन्मानामुळे ग्रामीण भागातील युवकांना संशोधन, शेती आणि समाजसेवा क्षेत्रात कार्य करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

शेतकऱ्यांचा मुलगा ते 'डॉक्टर' हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. डॉ. तुषार हाके यांचे हे यश भविष्यातील कृषी विकास आणि शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.a