Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध - सभापती तेजस्विनी कदम



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

​सातारा जिल्हा परिषद ही नेहमीच जिल्ह्यातील शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे. आम्ही एक जबाबदार पदाधिकारी म्हणून शाळांच्या सर्व समस्या, गरजा आणि विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांचा आढावा घेऊन अभ्यासपूर्ण काम सुरू केले असून जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहोत असे मत सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी मांडले. खटाव पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. शिक्षक व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांचा शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार व विविध विद्यार्थी लाभाच्या योजना यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

.       ​शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळा पूर्व तयारी संदर्भाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या शाळा पूर्व तयारीसाठीची तालुकास्तरीय बैठक बचत सभागृह वडूज येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील २४४ शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी मागील शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये राबवण्याच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. शाळा प्रवेशोत्सव, पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार, लोकसहभाग, स्पर्धा परीक्षा तयारी, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा या सर्वच बाबींवर प्रकाश टाकला.

 अध्यक्षस्थानी असलेल्या पंचायत समिती सभापती वनिता दुबळे यांनी नवीन शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा देताना तालुक्याचा शैक्षणिक आलेख चढता ठेवण्याचे सर्वांना आवाहन केले.

​यावेळी उपस्थित असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सदस्य श्री. धनंजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व शिक्षकांच्या स्पर्धा भाष्य करतानाच शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या गुणवत्तेसाठी काम करण्याचे आवाहन केले. बालआनंद मेळावे, भौतिक सुविधा, संगणक साक्षरता यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.

 गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी मुख्याध्यापकांना विविध प्रशासकीय सूचना देतानाच पटसंख्या वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न, नवागतांच्या स्वागतासाठी चे उपक्रम आणि विविध सहशालेय उपक्रमाविषयी भाष्य केले.

​पंचायत समिती सदस्य महेश वाघ यांनी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील फरक सांगताना मराठी शाळा आज कुठेही कमी नाहीत असे गौरवोद्गार काढले . तर पंचायत समितीचे सदस्य मनोज देशमुख यांनी कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान जसे यशस्वी केले तसे आता माझा ऑक्सिजन  माझी जबाबदारी या उपक्रमासाठी आपण पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यातील शिक्षकांच्या गट-गण निहाय बैठका घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याविषयीचे मतही त्यांनी मांडले.

​शिक्षकांमधून शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव व शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद खाडे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमोर तालुक्यातील शाळांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रश्न मांडले व गुणवत्ता वाढीसाठी तालुक्यातील सर्व शिक्षक संपूर्ण ताकदीनिशी कार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

​या बैठकीसाठी खटाव तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत समितीचे सर्व समन्वयक, केंद्रप्रमुख संजय दिडके, रफिक मुलाणी, राजेंद्र बागल, राजेंद्र भोसले, रमेश सुर्यवंशी, अजित निकाळजे, नवनाथ गावडे, धनाजी पवार हे उपस्थित होते.

​शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तर अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.