बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
समाजात चुकीच्या प्रवृत्तींचे उदात्तीकरण करण्याऐवजी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान व्हावा, युवकांसमोर योग्य आदर्श उभे राहावेत आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण कमी व्हावे म्हणून पुसेगाव पोलिसांनी राबवलेला उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
'चोर, गुंड, मवाल्यांचे बॅनर नका छापू, हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य बॅनरवर छापू' असा विचार करायला लावणारा संदेश असलेले फलक पोलिसांनी झळकवले आहेत.
गावागावांत वाढदिवस, तुरुंगातून जामीनावर सुटका किंवा किरकोळ कारणांवरुन दाढी वाढवून, गळ्यात व कानात सोन्याच्या असल्यासारख्या धातूच्या साखळ्या घालून स्वतःला 'दादा' म्हणून मिखणाऱ्यांचे मोठ-मोठे बॅनर झळकवण्याचा चुकीचा पायंडा वाढत आहे. अशा बॅनरमुळे विद्यार्थी, महिला व तरुणांवर विपरीत परिणाम होत असून समाजात चुकीच्या प्रवृत्तींना नकळत प्रसिद्धी मिळते. यामुळे मेहनत, शिक्षण, दातृत्व आणि कर्तृत्व यापेक्षा दहशत व दिखाऊपणालाच महत्त्व असल्याचा चुकीचा संदेश समाजात जातो. याच पार्श्वभूमीवर पुसेगाव पोलिसांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलिसांनीही बॅनर लावले आहेत. गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे युवक युवती, क्रीडा, कला, विज्ञान, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचे बॅनर लावावेत, त्यांचा गौरव करावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असा सकारात्मक संदेश या
फलकातून देण्यात आला आहे. पोलिसांचा हा उपक्रम केवळ फलकापुरता मर्यादित नसून समाजातील मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आहे. युवकांनी गुन्हेगारीच्या झगमगाटामागे न धावता शिक्षण, कष्ट, प्रामाणिकपणा आणि उज्वल भविष्याचा मार्ग स्वीकारावा, हा संदेश यातून प्रभावीपणे दिला गेला आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्तरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.





Social Plugin